आई मला सांगायचंय…

आज मातृदिना निमित्त मला शाळेत लिहिलेल्या “माझी आई” ह्या निबंधाची आठवण आली. त्यातले मुद्दे अजूनही लक्षात आहेत कारण ते पाठांतर करून लिहिले नव्हते. तोच काय कुठलाही निबंध लिहीतांना कधी छापील निबंध पुस्तकांची किंवा गाईड्सची गरज भासली नाही. कारण आजीने लावलेली वाचनाची आवड आईने जोपासली, घडवली आणि आपले विचार स्पष्टपणे मांडायला शिकवलं.
निबंधाची सुरुवात विषयानुरूप सुभाषित किंवा कवितेच्या अगदीच काय सिनेमातल्या योग्य त्या गाण्याच्या ओळीनें करावी हे ही मी आई कडून शिकले.
नास्ति मातृ समो गुरु: नास्ति मातृ समं तीर्थं
नास्ति मातृ सम: प्रभु: नास्ति मातृ सम: पूज्य: ||
(मातेसमान गुरु नाही, तीर्थ नाही, देव नाही आणि मातेसमान पूज्य कुणी नाही)

अशी सुरुवात करून त्या वयापर्यंत मला समजलेल्या माझ्या आई विषयी मी अगदी मनापासून तो निबंध लिहिला.
जसं जसं माझं वय वाढत गेलं आणि त्यानुसार समज ही. आता समज वाढलीय का नाही ह्या विषयावर आजही आई कडून चार शब्द ऐकायला मिळतात आणि तसेच ऐकायला मिळोत हीच प्रार्थना.
हा तर काय म्हणत होते.. जशी समज वाढली तशी आईला समजून घेण्याची माझी कुवतही वाढली.
प्रेम करणारी, काळजी घेणारी प्रसंगी दटावून चांगल्या सवयी लावणारी आई आजही तितकीच चांगली मैत्रीण आहे. आज मी तिच्याकडे फक्त आई म्हणून न पाहता एक माणूस म्हणून बघायला शिकतेय…
आई इतकं निःस्वार्थ प्रेम करणार आपल्या आयुष्यात कुणी नसतं… मूल लहान असताना आणि त्याला समज येईपर्यंत आईची भूमिका निश्चितच महत्वाची असते. ते करतांना प्रसंगी ती आपली आवड निवड, स्वप्न विसरते…
पण कधी वाटतं वर लिहिलेल्या सुभाषितांसारख्या विचारांमुळे आईवर कायम परफेक्ट राहण्याचं दडपण तर येत नसेल ?आईला उच्च पदावर ठेवताना आपण हे विसरतो की ती तर आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे.तिला ही राग येऊ शकतो, तीही चुकू शकते, तिलाही कंटाळ येऊ शकतो.
लहानपणापासून आई असते आपल्यासाठी त्यामुळेच की काय तिचं विश्व नेहमी आपल्याभोवती फिरेल असं आपण नकळतपणे गृहीत धरतो?

आई आज तुला सांगायचंय… परफेक्ट नसशील हरकत नाही…
कायमच तुझ्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, हरकत नाही…आयुष्याच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धैर्य तू माझ्या अंगी बाणवलंयस ते पुरेसं आहे.
कधी वाटेल तुला थकवा अन भावनांचं ओझं, हरकत नाही…तू घडवलेलं माझं खंबीर मन तो थकवा ते ओझं वाटून घेईल.
तशी तू असतेसच घरात पण कधी बाहेर मोकळा श्वास घ्यावासा वाटला, हरकत नाही…घर आपल्या सगळ्यांचं आहे आणि ते सांभाळण्याची जबाबदारीही सगळ्यांची ही तुझी शिकवण पुरेशी आहे.
एखादा नवा पदार्थ करतानाचा प्रयत्न कधी फसलाच तर, हरकत नाही… तो करतांना तू केलेली प्रामाणिक धडपड पुरेशी आहे.
कधी तुला कामांचा कंटाळा येऊन पुस्तकांमध्ये नाटक सिनेमांमध्ये रमवासं वाटेल, हरकत नाही… आपले छंद जोपासणं तूच मला शिकवलंयस.
कधी होईल तूझ्या कडून काही चूक, हरकत नाही… त्यातून शिकून आयुष्यात पुढे कसं जायचं हे तू मला शिकवलंयस.
कधी वाटेल तुला लहान व्हावं, हट्ट करावा हरकत नाही… बालपण कसं जपावं हे तुझ्याकडूनच शिकलेय.
कधी तुला मूल होऊन माझ्या कुशीत यावंसं वाटलं, हरकत नाही… मायेची ऊब काय असते ह्याचा अनुभव तू मला दिलायंस.
तुझे अनुभव तुझे प्रयत्न नकळत बरंच काही शिकवून जातात… तुला माझं मन वाचता येत तुझं मन वाचणं मी अजूनही शिकतेय…
आई म्हणून परफेक्ट होण्याचं दडपण नको घेऊस…मी तरी कुठे तुझी परफेक्ट मुलगी आहे !

© The copyright and other intellectual property rights of this content and material is owned by the writer and soulsanvaad.com

14 thoughts on “आई मला सांगायचंय…”

  1. Amruta!! What a fresh writing you have!! Your write up has transcended me to my Amma. Yes true all their struggles and their ways to tackle situation with a smile on the face are the greatest teachings that we as children could ever get. How I wish I could have got some more time with Amma to know her…to understand her…to give her every possible happiness…

    Liked by 1 person

    1. Thank you Shanthi glad you liked it. Yeah mothers are wonders. I’m sure your Amma is watching over you n Manu.. while you two create a special bond to cherish.

      Like

  2. अमृता,खूप छान शब्दांकन.लहान वयात उत्तम समज,उमज व जाण.आईची रूप तू चहू ढंगानी बघितलीस व आईची आई झालीस.
    पुढील लिखाणास अनेक शुभकामना.

    Liked by 1 person

  3. ‘आई मला सांगायचं आहे ‘ ह्या द्वारे अतिशय उत्तम संवाद साधला आहे. विचारांची खोली, मांडण्याची पद्धत आणी मुख्य म्हणजे learning outcome अतिशय उत्कृष्ट ! शुभेच्छा !

    Liked by 1 person

Leave a comment