सखा…

आज तो आला , नेहमीप्रमाणे गडगडाटात
हवेत गारवा पाण्याचे टपोरी मोती , ह्या थाटात

सैरभैर वारा अन पाचोळा पाला
ह्यांना सोबत घेऊन तो खूप नाचला

एरवी तो आला की मन माझं प्रफुल्लित व्हायचं
आज माझं लक्ष नाही बघून क्षणभर तोही थांबला बरसायचं

वीजांचा कडकडाट अन त्याचा प्रश्न –
‘ झालंय काय ग आज तुला ?’
मी उत्तर देत नाही पाहून तो जरा रुसून बसला

हलकेच मग त्याने वाऱ्याची झुळुक पाठवली मज जवळ
लडिवाळपणे कानांत शिरत तिने साधला संवाद प्रेमळ

तिच्या जवळ मी मन रितं केलं …
त्यासरशी तिने मला तिच्या कवेत घेतलं

म्हणाली अग एवढंच ना –
आयुष्य म्हंटल की हे चालायचंच ना ?

त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुला वाटलं तो गेला ?
पण वेडे तुझा पाऊस आहे तो; तो तर तुझ्या डोळी येऊन साठला
तुझ्याहून तो नाही वेगळा
तुमच्या मैत्रीचा आगळाच आहे सोहळा ||

खरंच की .. बालपणापासून पाऊस आहेच सोबत माझ्या
जपूनच तारल्या आहेत त्याने तेव्हापासूनच्या कागदी आणि भावनिक होड्या

आता बाहेरची वीज चमकली माझ्या मनात
अन तिने जाऊन सांगितलं माझं गुपित त्याच्या कानांत

ऐकून तो सौम्य झाला – मिश्किल हसला
आणि आकाशात माझ्या आवडत्या रंगछटा घेऊन आला

त्या पाहून मी नखशिखांत हरखले
आज माझ्या सख्याने मला पुरते ओळखले

हो, पाऊस, माझा सखा-
असा सखा, ज्याने माझे सारे भाव टिपले अलगद
त्याच्या आधाराने माझी नाजूक होडीही झाली गलबत
अशा सख्यावर मी उगीच रुसले
मळभ सारून, लगेच पावसाच्या अमृतात मन माझे परत चिंब भिजले ||

© 07.05.2021 The copyright and other intellectual property rights of this content and pictures are with the author and Soulसंवाद .

Advertisement

6 thoughts on “सखा…”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s