आज दसरा… सण म्हंटला की जणू मनाला सवयच लागलीये बालपणीच्या आठवणींच्या पोतडीतून काही क्षण हाती लागतात का बघायची.
दसरा-दिवाळी हे सण पाठच्या भावा-बहिणींसारखें येतात. दसरा येतो तेच दिवाळी येणार आहे हे सांगत. पण म्हणून काही त्याचं कौतुक करून घ्यायला तो विसरत नाही. आठवतंय तेव्हापासून दसराही आपल्याच थाटात येतो आणि कळत नकळत नवी सुरुवात देऊन जातो…
सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात व्हायची. प्रत्येकाची कामं ठरलेली. घरात टोपलं भर झेंडूची फुलं -आंब्यांची पानं आदल्या सायंकाळीच यायची. त्यापासून तोरणं आणि हार बनवायची जबाबदारी आमची- मी ,आजी आणि बहीण. बसकं -बैठं जुन्या पद्धतीचं स्वतंत्र घर आणि त्याला कुठ्ल्याशा गाण्यात म्हणतात तशा ‘आठशे खिडक्या नऊशे दारं ‘!! मागचं अंगण-दार, पुढचं अंगण-दार, देव्हारा, देवांचे फोटो, बाबांची गाडी आमच्या सायकली – असं सगळं मिळून तोरणं आणि हार बनवायचे. आणि मग पटापट आपआपल्या बादल्या घेऊन गाडी -सायकली धुवायला निघायचं. कॉलनीतल्या सगळ्या लहान मुलांच्या वेळा याबाबतीत जुळून यायच्या. मग गाड्या धुणं वगैरे कधी काम वाटलंच नाही. आईनी ४-५ हाका मारल्याशिवाय किंवा बाबांचा एकच आवाज ‘whichever is earlier’ च्या नियमा प्रमाणे आम्ही पोरं आपआपल्या घरी जात असू . अंघोळ वगैरे उरकून- आधी घराला तोरण बांधायचं – त्यातही मी बनवलेलं तोरण समोरच्या दाराला लागतंय ना हे खबरदारीने बघायचं. मग घरातल्या देव्हाऱ्यात शस्त्रं -अस्त्रांच्या प्रतीकात्मक पूजेसह, वही -पाटी पेन्सिल ह्यांचीही पूजा व्हायची. गाडी सायकलींची पूजा करून त्यांना पण हार घालायचे.
दसरा येतोय ह्याची आणखीन एक खूण म्हणजे, घरच्या श्रीखंडाची तयारी. घरात आईने दाराला एका सुती कापडात चक्का बांधलेला दिसला म्हणजे आता श्रीखंड पुरीचा बेत रंगणार हे नक्की. आता कामं करून दमल्यामुळे की स्वयंपाकाघरातून येणाऱ्या घमघमाटामुळे कोण जाणे पण पोटात कावळे सॉलिड ओरडायचे. श्रीखंड- पुरी, मसाले भात त्यावर किसलेलं खोबरं, कढी आणि सोबत भजे -कोशिंबिरी असं जेवण कधी मिळतंय ह्याकडे पोटाचं लक्ष. नैवैद्यच्या स्वयंपाकात लुडबुड नको म्हणून हातावर एखादा लाडू टिकवून आई ‘जा बरं बाहेर थोडावेळ’ असं म्हणून बाहेर धाडायची. त्या वाक्यासरशी मग वेलची -जायफळाच्या, मसाले भाताच्या खमंग आणि कढीला दिलेल्या कडीपत्ता, हिंग -जिऱ्याच्या फोडणीच्या सुवासात गुंतलेलं मन जागं व्हायचं बाहेर खेळायला जायला.
थोड्या फार फरकाने कॉलोनीतल्या प्रत्येक घरात असंच काहीसं होत असावं कारण त्यावेळी आमचे सवंगडी ही बाहेर भेटायचे. मग सुरु व्हायचं सायंकाळी कोणाकडे आणि कधी सोनं द्यायला जायचं ह्याचे बेत. मग कोण सोन्याच्या पानांचा स्टॉक ठेवणार अन कोण मिळालेल्या चॉकलेट -गोळ्यांचा असा सगळा प्लान आखला जायचा. पण सुरुवात करायची ते कॉलोनीत बसवल्या जाणाऱ्या देवीच्या मांडवातूनच ह्यावर सगळ्यांचं एक मत. नऊ दिवस देवीच्या आरतींने दणाणून असणारा मांडव विसर्जनानंतर दसऱ्याच्या दिवशी मात्र धीर गंभीर शांत असायचा.
जायफळ घातलेल्या श्रीखंडाच्या दुपारच्या झोपे नंतर मग सायंकाळच्या कामांना सुरुवात व्हायची. अंगण झाडून, सडा शिंपडून, नवी रांगोळी काढणं. रांगोळीच काम मात्र बहिणीचं हे लहानपणापासून जे ठरलंय ते आज ही कायम आहे. मग नवे कपडे घालून बाबांसोबत गावाबाहेरच्या देवीच्या दर्शनाला जायचं… सीम्मोउल्लंघन करायचं. येतांना गावातल्या मैदानावरच रावण दहन पाहून यायचं. घरच्या देवाला आणि मोठ्यांना सोनं देऊन नमस्कार झाला की आम्ही मुलं मग ठरल्या प्रमाणे… कॉलोनीतल्या घराघरात जायचो सोनं लुटायला आणि मसाला दूध, पेढे, लाडू,चॉकोलेट्स अशा वेगळंवेगळ्या गोष्टींनी आम्हा मुलांचं कोड-कौतुक व्हायचं. दुसऱ्यादिवशी शाळेत आवडत्या शिक्षक-शिक्षिका ह्यांना जपून ठेवलेलं आपट्याचं मोठ्ठ पान देण्यातही आगळीच मौज असायची.
असा एकंदरीत दसऱ्याचा सण साजरा व्हायचा. दसऱ्याचं महत्व आणि त्या मागच्या गोष्टी आई -बाबा दरवर्षी सांगायचे – सीम्मोउल्लंघन म्हणजे काय, ते का करतात , शमी वृक्षाची पानं सोनं म्हणून का लुटतात ,शास्त्र -अस्त्रांची ,पाटी -पुस्तकांची पूजा का करायची. त्या गोष्टींना धार्मिक आणि तात्विक अशा दोन्ही बाजू असायच्या. त्यामुळेच की काय आजही हे सगळं करतांना त्या गोष्टी नकळत मनात फिरून जातात. सण आताही तितक्याच उत्सहाने साजरा होतो. लहानपणच्या त्या गोष्टींना आता बुद्धीच्या कुवतीनुसार नवनव्या संदर्भांची-कारणांची झालर लागलीये. आज जग, मानवाने केलेल्या प्रगतीमुळे इतकं जवळ आलंय, घर बसल्या इंटरनेट मुळे देश-विदेशात स्थायिक झालेल्या आप्तेष्टांना व्हिडिओ कॉलने शुभेच्छा देता येतात. तेव्हा सीम्मोउल्लंघन गावाची वेस ओलांडणं एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही… आपल्या मनात असलेल्या अढीवर मात करणं, अज्ञानाला-गैरसमजांना दूर करणं, आपल्या शुद्ध हेतूंच्या पूर्तीसाठी मनानेच मनाला घातलेल्या मर्यादा ओलांडणं – अर्थात आपल्या ‘comfort zone’ मधून बाहेर पडणं म्हणजे सीम्मोउल्लंघन. रावण दहन तेव्हाही प्रतिकात्मकच होतं. अर्थ मोठं होतांना कळला, तो मनाला भिडला एका गाण्याच्या ओळीमुळे “मन से रावण जो निकाले राम उसके मन में हैं “– आणि तो अमलात आणण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे…वाईट – नकारात्मक विचारांचा , सवयींना सोडचिट्ठी देऊन.
म्हणून दसरा हा नवीन सुरूवातीचा दिवस… आज ह्या दिवशी मी ३ महिन्यांपासून मनात असलेल्या “मला वेळ नाही .. blog कसा लिहू आणि पूर्ण करू” ह्या विचाराला हरवून …ही पोस्ट टाकतेय …
तुम्ही काय करताय /केलंय ह्या दसऱ्याला ? तुमच्या आठवणी आणि कुठल्या ‘comfort zone‘च सीम्मोउल्लंघन करणार ? हे जाणून घ्यायला आवडेल मला.

© 25.10.2020 The copyright and other intellectual property rights of this content and pictures are with the author and Soulसंवाद .
Nostalgic moments captured in a very beautiful way. I love your writing Amruta 🙂
Keep writing more and more such beautiful piece.
LikeLiked by 1 person
Thank you Shanthi.🙂
LikeLike
खूप छान 👌 वाचतांना लहानपणीचा दसरा आठवला 🙂
LikeLiked by 1 person
धन्यवाद 🙂
LikeLike
Beautifully written 👍
Happy Dusshera 🎉
LikeLiked by 2 people
Thank u. Same to u.
LikeLike