आजोळ

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो. सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी जाऊन केलेली मजा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड तर क्वचित कधी त्यांच्या हातचा बसलेला मार. माझं बालपण ह्या सगळ्यात खूपच चंगळीच होतं. आजी – बाबांची आई, तिचा सहवास लहानपणापासून होता. रात्री झोपताना रामायण-महाभारतातल्या गोष्टी ती रंगवून सांगायची. आमच्या घरातल्या बंगळीवर झोके देत भक्ती -भाव गीते ती म्हणायची . कुल्फी वाला ,जांभूळ -बोरं विकणारा दारावर आला की आजी जवळ हट्ट करायचा हे ठरलेलं. ती सोवळ्यात पुजेला बसली की हमखास तिला त्रास द्यायचा.आईने तसा कधी मार दिला नाही पण कधी जर तो क्रोधरूपी प्रसाद मिळालाचं तर मात्र  आजी जवळ गुपचूप बसायचं हे ही ठरलेलंच .

सुट्ट्यांमध्ये आजी आजोबांकडे-आईच्या माहेरी जाणं व्हायचं. आजही तो लाल डब्यातला प्रवास आठवतो. आईला हट्टाने घेऊन मागितलेले खारे शेंगदाणे लिमलेटच्या गोळ्या. गावी जायला मिळतंय ह्याने उत्साहित झालेलं मन आधी बाहेरची मजा पाहण्यात गुंतायचं ,मग आई जवळ ‘कधी येणार आजीच घर’ अशी चुळबुळ करण्यात आणि नंतर झोपेत गुंगून जायचं. जाग यायची ती थेट गावी पोहचल्यावर. तसा आईचा चेहरा नेहमीच हसरा असतो पण तिथे पोचलं की तो वेगळाच खुलायचा.. का ते आता उमगतंय. बसचा प्रवास संपला की घरी जायला माझी आवडती सायकल-रिक्षा तयार असायची. रिक्षेच्या फळीवर बसून दोन्ही हातांनी दांडा घट्ट पकडत गावातली मज्जा बघत जायचं..त्यात जर रिक्षावाल्याने वरच टप मोकळं केलं तर अहाहा !! गाव लहान असल्यामुळे किंवा त्या काळी ‘सोशल’ होणं ‘virtually’ मर्यादित नसल्यामुळे असेल गावात आजोबांना सगळे ओळखायचे ,पर्यायाने आईला. वकीलसाहेबांची मुलगी आणि नात आली हे त्यामुळे साऱ्या गावाला कळायचं. मुख्य रस्त्यावरून जशी रिक्षा आत वळायची तसं कोपऱ्यावरच श्री गाडगे महाराजांचं मंदिर दिसायच… मला त्या मंदिरात जायला आवडायच कारण तिथे ससे ठेवलेले असायचे.

रिक्षा घराजवळ पोहचली की उडी मारून पटकन दारात उभ्या असलेल्या आजीला मिठी मारायची. घर तसं बसकं होतं पण थोडं  उंचावर असल्यामुळे अगदी 5-6 पायऱ्या असतील एवढा जिना होता चढायला आणि त्याचा कठडा म्हणजे माझी घसरगुंडी ! किमान आठवडाभर तरी आपल्याला इथे हवी ती मज्जा करता येईल ह्या आनंदात घरभर उंदडायचं आणि उंदडायला जागाही भरपूर होती. माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे “गोठा” तिथल्या गाई-म्हशी आणि वासरांना नावं दिलेली मी. त्यांना चारा टाकणे – अंघोळ घालणे हे माझे आवडते उद्योग. घरी ‘बायोगॅस प्लांट’ होता ,त्याच कार्य काय अन कसं असतं हे मी शाळेआधी आजोंबांकडून शिकले प्रात्यक्षिकासह ! आजोबा तसे कामानिमीत्त बाहेर असायचे त्यामुळे त्यांच्यासोबत फारसा वेळ मिळायचा नाही. पण त्यांच्या काही गोष्टी आजही अगदी स्पष्ट आठवतात. रोज सकाळचा त्यांच ‘खाली डोकं वर पाय’ हे आसन पाहायला कुतुहूल वाटायचं ‘कसं काय करतात बुवा हे असं ?’ त्यांच्या सोबत गावातल्या राम मंदिरात जाणं व्हायचं. सोबत म्हणजे, ते पुढे आणि मी त्यांच्या मागे. आजोबांची ती सवयच होती, हात मागे बांधून झोकात चालायची आणि त्यांच्या खांद्यावर शबनम अडकवलेली. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी ‘कसं काय वकीलसाहेब’ म्हंटलं की तेवढ्यापुरते नमस्कारासाठी हात सुटायचे. आजोबांना पान खायची सवय होती आणि त्यांचं पान ते स्वतः बनवायचे. त्यांचा पानाचा डबा मला भारी आवडायचा…चकचकीत पितळेचा डबा ,पान कुटायला खलबत्ता कायम त्यांच्या शबनम मध्ये असायचा आणि त्या डब्यातल्या जेष्ठमधावर माझा डोळा !!

आजीची आणि माझी खास गट्टी. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री झोपेच्या गोष्टींपर्यंत आजीच्या मागे मागे मी ! तिच्या शेजारी कधी झोपेत गुडुप व्ह्याचे ते कळायचं नाही. केसांमधून हात फिरवत ,बोटांनी केसांत हलकी वर्तुळं काढत मालिश देत तिने अनेक गोष्टी सांगितल्या -‘लांडगा आला रे आला’ , ‘बोबड्या बहिणी’ पासून ते इसापनीतींच्या गोष्टींपर्यंत ! माझी सगळ्यात आवडती होती.. भोपळा अन म्हातारीची. ती सांगताना आजी जेव्हा ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ म्हणायची तेव्हा अगदी खदखदून हसू यायचं. तिच्याबरोबर गावातल्या लायब्ररीत जायला मला आवडायचं आणि महत्वाचं म्हणजे माझी पुस्तकं ती मला निवडू द्यायची .. ‘चाचा चौधरी आणि साबू’ मला पहिल्यांदा तिथे भेटले. आजी सारखी शांत अन समंजस व्यक्ती मी आजवर पहिली नाही. आज ८५व्या वर्षीही तिचं वाचन चौफेर आहे. गोष्टीतल्या म्हातारीसारखं टुणूक टुणूक नाही पण ती सतत काही ना काही तरी करत असते. तिला फारसं कधी कुणा व्यक्ती -आयुष्याविषयी नकारात्मक बोलतांना ऐकलं नाही,कितीही कटु अनुभव आले तरीही. पहिल्या लेकीची पहिली लेक म्हणून आजी-आजोबांनी भरपूर कौतुक केलं तसंच मावशीने आणि मामांनीही लाड केलेत…  ह्या  सगळ्यांच्या मायेनी आणि आठवणींनी बालपणीची माझी गोधडी उबदार आणि रंगबेरंगी आहे…

दर्यापुरचा मुक्काम आटोपला की तो हलायचा अमरावतीला -आईच्या मामांकडे थोडक्यात माझ्या ‘एक्सटेंडेड आजोळी’. लग्नघर वाटेल इतकी माणसं जमायची तिथे सुट्टयांत .. सख्ख-चुलत -मावस अशी काही लेबलं नव्हती. मावशी ,मामी आणि मामा ह्या पैकी एक नातं पुरे होतं आणि त्या नात्याला प्रतिसादही तसाच मिळायचा. आमरसाचं जेवण, डेसर्ट कूलरची थंडगार झोप, भावंडांसोबत ची झिंज्या उपट भांडणं कम धमाल, त्यावरून क्वचित बसलेला आईचा धपाटा आणि त्यानंतर मावशीने ‘अग आधी (बहिणीने) तिनेच हिला मारलं असेल’ असं म्हणत केलेले आपले लाड .. असे एकंदरीत सुट्टीचे दिवस मजेत जायचे.

असं भरलेलं आजोळ – माणसांनी आणि आठवणींनी मनातला एक कोपरा व्यापून टाकतं. का माहितीये ? कारण आमच्या मोठ्यांनी ते निरागसपणे जपलं त्यांच्यात असतीलही मतभेद पण आमच्या पर्यंत ते कधी त्यांनी पोहचू दिले नाहीत.

तुम्ही आजी-आजोबा असाल तर नातवंडांना दुधावरच्या सायीप्रमाणे जपतच असाल, तसं करतांना ते एकच नातं मनात ठेवा आणि… जर तुम्ही आई वडील असाल तुमच्या मुलांना आजी आजोबांचं (दोन्हीकडच्या बरं का) प्रेम-लाड मिळत असतील तर तेवढ्यापुरते का होईना असलेले मतभेद विसरा… बालमनावर निरागस क्षणांची पाखरण राहूद्या कळतनकळत त्यांना ती घडवते…

आजोळ – लहानपणीच्या आठवणींचा खजिना, मी माझा जपलेला काहीसा तुमच्यासमोर उलगडला … काहीसा अजून गुपित..तुम्हाला आठवलेत का तुमचे आजी आजोबा ? 😃 

© 19.07.2020 The copyright and other intellectual property rights of this content are with the author and Soulसंवाद  and picture source is internet/web.

Advertisement

12 thoughts on “आजोळ”

 1. Blog mast aahe.
  Mala khoop awadla.
  Kahiche vichitra pan mi fakt reader madhe aslele post like karu shakte ani comment dekheel.
  About post la like click keli tar hot nahi.
  P.S. problem blog cha nahi maza asava.

  Stay safe and healthy.

  Liked by 1 person

  1. Thank you Rupali 🙂
   अरेच्या.. असं व्हायला नको खरं तर..
   डायरेक्ट ब्लॉग लिंक वर जाऊन करता येतंय का बघा.. soulsanvaad.com

   Stay safe and healthy.

   Liked by 1 person

 2. हो नक्कीच आठवलं, तश्या आजोळच्या आठ्वणी कमीच आहेत, कारण आजोबा(आईचे बाबा ) मी लहान असतानाच गेले. आजी मामाकडेच असायची. पण वडिलांचे आई बाबा(आजी, आजोबा) आमच्या सोबतच होते. आजोबांचे लवकर उठवुन अंघोळ घालने, सोबत रेडिओवर पहाटेची भक्ती ऐकताना शरिरासोबत मन ही धुतले जात आहे अस वाटायचे. चुलीवरच्या माती लावलेल्या पातेल्याचा एक वेगळाच वास, खुप छान वाटायचा.
  गरम गरम चहा आणि बटर किंवा खारी मस्तच. चार आने मधे मन भरेल एवढा खाऊ मिळायचा. आप्पा गावाकडच्या त्यांच्या आठ्वणी सांगायचे, एकाहून एक suspense आणि thriller.
  अश्याच खुप आठ्वणी ताज्या झाल्या.

  Thank you अमृता हा लेख लिहिला आणि तो आम्हाला वाचायला मिळाला म्हणून. लिहित रहा.

  Liked by 1 person

  1. धन्यवाद विजय 🙂
   लेख वाचून तुमच्या आजी आजोबांच्या आठवणी ताज्या झाल्या.. छान वाटलं. तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा आणि अभिप्राय लिखाणास मदत करतात 🙏

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s