आठवणीतलं पान …

शाळेत असतांना, नववी-दहावीत बाबा आमटे आणि त्यांच्या कार्यावर एक धडा होता, तेव्हा पहिल्यांदा आनंदवनाविषयी वाचलेलं. पुढे वाचनाच्या आवडीमुळे अभ्यासक्रमाबाहेरची त्यांच्यावरची काही पुस्तकं वाचली. मन त्यावेळी भारावून गेलेलं … एखादा माणूस कसा काय आपलं घरदार सोडून एवढ्या निःस्पृहपणे लोकांसाठी -कुष्टरोग्यांसाठी हे सगळं करू शकतो? कुठून एवढी इच्छाशक्ती येते, प्रेरणा मिळते ? बरं, ते एकटेच नाहीत तर त्यांची अर्धांगिनी, मुलं -पुढे त्यांचं कुटुंब सगळेच या कार्याला आपलं आयुष्य वाहतात. आजही ह्या सगळ्यांच्या कार्याविषयी तितकंच कौतुहल अन आदर आहे. त्यावेळी बाबांच्या जीवनाने-कार्याने प्रेरित होऊन काही शब्द कवितेच्या रूपात मांडले होते.
ही कविता त्यांना प्रत्यक्ष भेटून देण्याचं भाग्यही मला लाभलं पण वेळ मात्र प्रसन्न नव्हती … ते नागपूरला अवंती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होते.मी आणि माझी मैत्रीण-रूममेट त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी गेलो.खरंतर भेटू देतीलही कि नाही ह्याची खात्री नव्हती,पण इच्छा प्रबळ असली की इप्सित साध्य होतं असं म्हणतात तसं झालं.आम्ही त्यांच्या खोलीत गेलो बाबा झोपून होते, साधनाताई त्यांच्या शेजारी बसून होत्या. आम्ही दोघींनी आमची ओळख सांगितली, आणलेली फुलं दिली आणि मी जरा चाचरतच माझ्या कवितेचा कागद साधनाताईंना दिला. त्यांनी तो उलगडून वाचला .. हलकंसं स्मित करत त्या म्हणाल्या छान लिहिलंयस, त्यावेळी मनात समाधानाची एक लहर फिरली – त्यांच्या प्रेरणेने स्फुरलेले शब्द त्यांच्यापर्यंत पोहचले!त्यानंतर ताईंनी आमची विचारपूस केली -काय शिकतो वगैरे. बाबा आणि ताईंच्या कार्याचं अप्रूप ,एवढ्या मोठ्या व्यक्तींना प्रत्येक्षात पाहता -भेटता येण्याचा आनंद किंवा त्यावेळी बाबांच्या असलेल्या प्रकृतीचं दडपण …नेमकं कशामुळे ते नाही सांगता येणार पण त्या दोघांना नमस्कार करून तिथून निघतांना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते … पाच-दहाच मिनिटांची ती भेट पण आयुष्यभरासाठीची एक अमूल्य आठवण .
ती कविता आज इथे मांडतेय … शब्दांची निवड अन मांडणी त्यावेळच्या माझ्या भाषेच्या ओळखीवर आणि ज्ञानावर आहे , त्यामुळे कदाचित जरा अपरिपक्वव वाटतील …परंतु त्यामागचे विचार आजही आधार देतात.


जीवन कसं असावं ?
जीवन कसं असावं ?
जीवन असावं वृक्षा सारखं छाया देणारं
आश्रयाला येणाऱ्या पाखरांना ऊबदार माया देणारं,
खंबीर होऊन वेलीला आधार देणारं
एवढं करूनही जमिनीत घट्ट पाय रोवणारं.
एखाद्या पक्ष्यासारखं आकाशात विहार करणारं
आपुलकीने एकमेकांना दाणे भरणारं,
स्वातंत्र्याच्या लालसेने आकाशात भरारी मारणारं
पण त्याचवेळी आपल्या घरट्याशी नातं सांगणारं.
इंद्रधनुष्यासारखं इतरांच्या जीवनात रंग भरणारं
सप्तरंगी रम्य चित्र रेखाटणारं,
जवळच्यांच्या ओठावर स्मित आणणारं
त्याचबरोबर सगळ्यांच्या रंगात मिसळणारं.
पाण्या सारखं निर्मळ असणारं
दुःखाबरोबर सुखात ही अश्रू रूपाने गळणारं,
कितीही प्रहार झाले तरी न दुभंगणारं
मनातला दाह शांत करणारं.
प्रकाशासारखं सारं जग उजाळणारं
निराशेच्या गर्तेत जाण्याऱ्याला वर आणणारं,
अंधारातही आपलं अस्तित्व टिकवणारं
आशेचा नवा किरण दाखवणारं.
एखाद्या लहान मुलासारखं निरागस असणारं
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारं,
बाहेरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठीआसुसणारं
पण त्याचवेळी आईच्या पदराशी नातं सांगणारं.
वाऱ्याच्या झुळूकीसारखं अल्प जरी असणारं
तरीही भर उन्हात सोबत करणारं,
नकळतच मनाला स्पर्शून जाणारं
असं असावं जीवन-
प्रेरणा देणारं
उत्साहाने सळसळणारं
प्रेमाने ओथंबणारं
अन आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारं.

© 09.07.2020 The copyright and other intellectual property rights of this content and material including photographs , graphical images and the layout is owned by the author and Soulसंवाद

Advertisement

11 thoughts on “आठवणीतलं पान …”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s