अनोळखी जगातलं ओळखीच जगं

प्रेम! हा शब्द फक्त कथा कादंबऱ्यांतच वाचलेला, अनुभवलेला. नंतर कॉलेजमधल्या मित्र – मैत्रिणींच्या अनुभवांवर प्रेम या शब्दाशी अजून थोडी ओळख वाढली.
या सगळ्यात मला ला एक मात्र जाणवलं आपल्यासोबत खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं कधीच घडणार नाही! आपण या भावनिक गुंत्यात अडकूच शकत नाही. “I am damn practical girl -being crazy -loving hopelessly is not my cup of tea. All these things are meant for novels and movies.”

ते झुरणं – एका भेटीसाठी आतुर होणं – केवळ आवाज ऐकण्यासाठी आसुसण – छे ! कधीच जमायचं नाही ते. मला कधी कोणी असा आवडेल आणि आवडलाच तर त्याच्या अन माझ्या मनाची स्पंदनं इथवर जोडल्या जातील याची शक्यता फार म्हणजे फारच कमी!
आयुष्य येईल तसं आनंदाने जगायचं आणि प्रेम या संकल्पनेवर मनापासून प्रेम करायचं असं झकास आयुष्य मी जगत होते … आणि… आणि…

अशातच तू माझ्या आयुष्यात आलास. पहिल्यांदा भेटलो तेव्हा असं वाटलं नव्हतं- की वरवर शांत वाटणाऱ्या माझ्या मनात तू प्रेमाचे तरंग उठवशील ते !
पण म्हणतात ना-
“तो आला- त्याने पाहिलं- आणि त्याने जिंकलं!”
तसंच काहीसं घडलं-
अर्थात ते काही लव्ह अट फर्स्ट साईट वगैरे नव्हतं ! खरं तर तसा व्हायच्या वयातही नव्हतो आपण !
आधीच एका नात्यात होरपळलेला तू आणि कधीच कुठल्या नात्यात स्वतःला बांधून न घेणारी मी.

जुजबी ओळख मैत्रीत बदलली अनोळखीपणा चा पडदा सरकला आणि डोळ्यांमध्ये मैत्री डोकावू लागली गप्पा रंगल्या-
बालपणीचे किस्से, कॉलेज दिवसातल्या रम्य आठवणी, आयुष्यात काय हवंय-काय करायचंय ह्याचे मनसुबे, मनातल्या सुप्त इच्छा आणि मनाला बोचत असणारा सल कसलाही आडपडदा न ठेवता सांगितले गेले.
रात्र इतरांसाठी गूढ होती- पण आपल्यासाठी…आपल्यासाठी मात्र मनातला एक एक कप्पा अलगद नकळत उलगडणारी किमयागार होती ! तुझ्यासोबत मी एका वेगळ्याच अनोळखी जगात वावरत होते- असं जग जिथे फक्त आपण दोघे होतो- आपण दोघेच ! एकमेकांच्या निखळ सान्निध्यात रमणारे…

मनातलं हितगूज ओठांवर यायचं

कानांवर त्यांचे शब्द पडायचे

मन मात्र त्यातल्या भावना टिपायचं

आणि त्याचं हसू तुझ्या चेहऱ्यावर उमलायचं

तुझ्या सहवासात खरी मी- माझ्यातली मी मला गवसले. संसाराचे कुठलेच पाश त्या जगात नव्हते माझ्यासोबत तू म्हणजे ‘खरा तू’ होतास खरा तू म्हणजे-

वरवर जरी रुक्ष वाटणारा तरी आतून
भावनांची ओल जपणारा..

कधी मिश्किल.. तर कधी गंभीर
कधी जिद्दी.. तर कधी समंजस
कधी रागावणारा.. तर कधी मनवणारा

अशा अनेक रूपात तुम्हाला भेटत गेलास. माझ्या मनाला तुझं सगळ्यात भावलेलं रूप म्हणजे- रागावलेला असतानाही माझी काळजी घेणारा तू !तुझ्यासोबत वेळ घालवताना- कधी माझं मन तुझ्यात गुंतलं अन मी तुझ्या इतक्या जवळ आले कळलच नाही !
तू नसतोस तर मन सैरभैर होतं.. नजर तुला शोधते.. तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसली की काळजाचा ठोका चुकतो रे माझ्या ! बरेच दिवस भेट झाली नाही तर नुसता तुझा आवाज ऐकायला ही मन अनावर होतं !

आणि मग लक्षात आलं- ज्या भावनेला आजवर पुस्तकांतून अनुभवलंय तिची मनाला ओळख करून देणारा तू आहेस… मित्र अनेक आहेत- मनाचा ठाव घेणारा…मनावर राज्य करणारा मात्र तू एकमेव ! बाह्यरूपाकडे आकर्षित होणारे बरेच असतात, त्यातली मी नाही तुलाही माहिती आहे – मी ओढल्या गेले ते तुझ्या प्रामाणिक मनाकडे- प्रांजळ अन क्वचित मिश्किल अशा डोळ्यांकडे !
ऐ, तुला माहितीये तुझ्याही नकळत तुझे डोळे अन स्पर्श बोलतात…अन त्यांनी तुझ्याही नकळत माझ्या मनाला प्रतिसाद दिलेला !

पण या भावनेची कबुली तुझ्याजवळ देऊ तरी कशी ?

तू त्या अनोळखी जगातच सारे क्षण ठेवून आलास…पण माझा या जगातला प्रत्येक क्षण त्या क्षणांपासून प्रेरित होतो…

© The copyright and other intellectual property rights of this content and material including photographs , graphical images and the layout is owned by the author and soulsanvaad.com

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s