आली दिवाळी…

परवा ऑफिस मधून निघतांना हॉलिडे कॅलेंडर वर नजर गेली तेव्हा क्लिक झालं ‘अरे, दिवाळी आठवड्यावर आलीये आणि आता तयारी सुरु करावीच …’ आणि मग कॅब मधल्या निवांत वेळेत कामांची, खरेदीची यादी तयार करायला घेतली. ऑफिस ची सवय.. “task list” बनवायची!! फराळाच्या पदार्थांची पाककृती इंटरनेट वर बघतांना हरवलं की मन आठवणींमध्ये…

लहानपणी तर…दिवाळी म्हंटलं की महिनाभर आधीच तयारी सुरु ! परीक्षा कधी संपते आणि दिवाळीची सुट्टी सुरु होते ह्याचे वेध. कित्ती काही करायचं असायचं. नवा ड्रेस घेण्यासाठी हट्ट ! हो, कारण त्यावेळी वाढदिवसाला आणि दिवाळीला असं वर्षातून दोनदा हक्काने नव्या ड्रेससाठी हट्ट करता यायचा. मग मैत्रिणींमध्ये मिरवण्यासाठी चढाओढ. रांगोळी कुठली काढायची ते ठरवण्याची धडपड. अगदी प्रत्येक दिवशी आपल्या रांगोळीचं डिजाईन वेगळं अन आकर्षक असायला हवं हा प्रयत्न.

फराळी पदार्थांची रेलचेल चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी, कडबोळी असे नाना-विविध पदार्थ आई आणि आजी बनवायची. त्या पदार्थांच्या नुसत्या वासाने तोंडाला पाणी सुटायचं !

फटाके ! दिवाळीचा अविभाज्य भाग. बाबांसोबत फटाके खरेदी करायला जाणं.. खूप आवडायचं.. ते फटाक्यांचे स्टॉल्स.. अनार, भुई चक्र, फुलबाज्या, लवंगी फटाके, सापाच्या गोळ्या, रंगीत पेंसिल्स अशी सगळी विना आवाजाच्या फटक्यांची खरेदी व्हायची. घरी आल्यावर बाबा मला आणि बहिणीला ते फटाके वाटून द्यायचे, नंतर भांडणं नकोत म्हणून ! घरी बनवलेला आकाशदिवा, पणत्यांची रोषणाई याची मजा औरच असायची. आता बालपणातल्या दिवाळी ची मजा मागे राहिली.

आधी परीक्षेनंतर सुट्टी तर मिळायची पण आता ऑफिसला दोनच दिवसाची सुट्टी असते. पूर्वी सारखं नवे कपडे घ्यायला वाढदिवस किंवा दिवाळीची वाट पाहावी लागत नाही.. मनात आलं की घेतले जातात.

फ्लॅट संस्कृतीमुळे अंगणच लोप पावतंय तर रांगोळी तरी कुठे काढणार. काही उत्साही आणि कलाकार मैत्रीणी आहेत खरं ज्या छाप्यांनी, स्टिकर्स लावून किंवा फुलांच्या रांगोळ्या मांडतात – त्यांचंही कौतुक आहेच.

फराळाचं तितकस अप्रूप राहिलं नाही. कदाचित ते पदार्थ आता बाराही महिने मिळतात म्हणून असावं. वेळेअभावी बहुतेक घरांत हे पदार्थ बाहेरून मागवले जातात. धावपळीच्या जीवनातं अशी सोय बघण्यात तसं काही गैर नाही. पण फराळाच्या पदार्थ बनवतानाचा तो घमघमाट माणसांबरोबर घरं ही मिस करत असावीत नाही का?

दिवाळी खरं तर आज खूप प्रकाशमय असते भरपूर विविध प्रकारचे विद्युत दिव्यांनी सजलेली. पण तरीही वाटत या सगळ्या रोषणाई पेक्षा माणसांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणणारी ती दिवाळी खासच!!

दिवाळी – सण तोच पण त्याला साजरा करण्याची पद्धत बदलली. काळाप्रमाणे बदल घडणारच… पण एक गोष्ट मात्र बदलायला नको… रोषणाई इतकेच प्रकाशमान माणसांचे आनंदी चेहरे आणि मनं !!

शुभ दीपावली !!

अमृता…

© The copyright and other intellectual property rights of this content and material including photographs , graphical images and the layout is owned by the author and soulsanvaad.com

10 thoughts on “आली दिवाळी…”

Leave a comment